Breaking News

बैल पौळा सणावर यंदा विरजण; शेतकऱ्यांनी अंगणातच केली आपल्या सर्ज्या-राज्याची पूजा..


यंदा बैलांची मिरवणुकी विना शेतकऱ्यांचा झाला हिरमोड..!

बाजारात खरेदी वाचून हजारो मातीच्या बैलजोड्या पडून

बीड : बैल पौळा हा सण म्हटलं की गावा-गावातून बैलांची वाजत गाजत निघालेली  मिरवणूक.. त्यातील उत्साही वातावरणाने आनंदी  झालेले गाव..मात्र यंदा कोरोनाचं सावट असल्यामुळे बैल पौळा सणावर विरजण पडलं आहे. बीड जिल्ह्यातील सहा शहरात लॉक डाऊन असल्याने बाजारात मातीच्या बैल जोड्या पडून आहेत तर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये. म्हणून प्रशासनाने मिरवणूक न काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा हिरमोड झाल्याचे दिसत होते. 
शेतकरी आणि बैलाचं जिव्हाळ्याचं नातं घट्ट करणारा सण म्हणजेच बैल पोळा. हा सण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने शेतकरी- पशुधन मालक साजरा करतात. यंदा कोरोनाचं सावट बैल पोळा सणावर आल्याने मातीच्या बैलजोड्या विक्री वाचून पडून आहेत. हा सण दरवर्षीप्रमाणे यंदा मिरवणूक न काढता घराच्या अंगणात आपल्या पशुधनाची पूजा करावी लागणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये निरुत्साह दिसत होता. 

दरम्यान बीड जिल्ह्यातील सहा शहरात लॉक डाऊन असल्याने बाजार पेठा बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या सर्जा-राजा साठी घुंगरु माळ, झूल रंग-रंगोटीचं साहित्य खरेदी करता आलं नाही. सजलेल्या आपल्या बैलजोड्या गावातून मिरवता येणार नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला होता. बारमाही आपल्या साठी राबणाऱ्या सर्जा- राजाची  बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी घराच्या अंगणात पूजा केली तर लॉक डाऊन असलेल्या शहरातील नागरिकांनी  बैलजोडीच्या फोटोचे पूजन केलं.  

कारागीर हताश..!
बाजारपेठेत हजारो मातीच्या बैल जोड्या विक्री वाचून पडून आहेत. त्यामुळे कारागीर देखील हताश झालेत. यंदा कोरोनाचं सावट ओळखून कुंभारांनी देखील मोजक्याच मातीच्या बैल जोड्या तयार केल्या होत्या. परंतु आज पोळ्याचा सण असताना देखील केवळ बोटावर मोजण्या इतक्याच बैल जोड्या विकल्या गेल्यात. त्यामुळे उसनवारी करून तयार केलेल्या बैलजोड्या पडून आहेत. 

No comments