Breaking News

दिंद्रुडला कोरोनाच्या जनजागृतीसाठी अधिकाऱ्यांची भेट; नियम न पाळणार्‍यांकडून नऊ हजारांचा दंड वसूल दिंद्रुड : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दिंद्रुड येथे जनजागृती मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत मास्क न वापरणार्‍या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच ज्या किराणा दुकानदारांनी दर्शनी भागावर  भावफलक लावले नाही. अशा दुकानदारांना दंड ठोठावण्यात आला. 
          माजलगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेले दिंद्रुड हे रहदारीचे ठिकाण आहे. धारुर परळी, वडवणी व माजलगाव तालुक्यातील नागरिकांची येथे वर्दळ असते.  कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर  जिल्हा मुख्य लेखा वित्त अधिकारी शिवप्रसाद जटाळे यांच्या चमूने  गुरुवारी येथे भेट दिली. कोरोना बाबत जनजागृती केली व टाळेबंदीचे नियम मोडणारांवर कारवाई करत ९ हजारांचा दंड वसूल केला. 
         मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशावरून मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद जटाळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी सुभाष साळवे, माजलगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व्ही.टी.चव्हाण, विस्तार अधिकारी रोडेवार आदींनी येथील व्यापारी व वाहन चालकांना विना मास्क फिरणे, कोविड च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी चे नियम न पाळणे, किराणा दुकानात भावफलक न लावणे आदी बाबींवर कारवाई करत  दंड ठोठावला.
            या पथकातील शिवप्रसाद जटाळे यांनी प्रसार मांध्यमाशी संवाद साधला. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी शासन  विविध स्तरावर पावले उचलत आहे. मात्र यासाठी सर्व दुकानदारांनी सामाजिक अंतराचे नियम पाळावेत. तसेच मास्क व सॅनिटायजरचा नियमित वापर करावा असे आवाहन केले. शासनाच्या निर्देशाचे पालन न करणार्‍या व्यक्तीवर यापूढे कठोर कारवाई केली जाईल असेही जटाळे म्हणाले.
          अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयास भेट देवून अभिलेखे तपासले. तसेच ग्रामविकास अधिकारी नवनाथ पवार यांना काही सुचना देखील केल्या. यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments