Breaking News

विघ्नहर्त्याच्या आगमनाने कोरोनाचे मळभ दूर व्हावे - धनंजय मुंडे


गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देत कोरोनाविषयक खबदरदारी घेण्याचे केले आवाहन

परळी : विघ्नहर्ता श्रीगणेशाच्या आगमनाने जगावरील कोरोनाचे मळभ दूर व्हावे अशी प्रार्थना श्रीगणेशाला करत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा वासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच गणेशोत्सवादरम्यान शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करत कोरोनाविषयी खबरदारी घ्यावी असे आवाहनही केले आहे.

गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा व सबंध राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा उत्सव;कोरोनाच्या सावटाखाली या वर्षी अत्यंत साधेपणाने सर्वत्र साजरा केला जात आहे. गणेशोत्सव काळात कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यादृष्टीने राज्य व जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांना देखील आवश्यक परवाने काढण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यात एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळांनी देखील रीतसर परवानगी घेऊन व सर्व नियमावलीचे पालन करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा असे ना. मुंडे यांनी म्हटले आहे.

प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळांनी सॅनिटायझर आदींची व्यवस्था करून ठेवावी तसेच दर्शनाला येणाऱ्या नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक करावे. त्याचबरोबर कुठेही गर्दी जमणार याची खबरदारी घ्यावी, दर्शन व आरतीचा लाभ देण्यासाठी विविध समाजमाध्यमांचा वापर करावा असेही ना. मुंडे यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे.

श्रीगणेशाच्या आगमनाने जगावरील कोरोना महामारीचे हे मळभ दूर व्हावे यासाठी सर्वजण श्रीगणेशाला प्रार्थना करूयात, असे ना. धनंजय मुंडे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

No comments