Breaking News

तुटलेल्या विद्युत तारेने बैलचा घेतला जीव


चिंचाळा येथील घटना; महावितरणचा भोंगळ कारभार, शेतकऱ्यांमध्ये संताप

के. के. निकाळजे । आष्टी
शेतीतील विद्युत खांबावरील तुटलेल्या तारेवर बैलाचा पाय अचानक पडल्याने त्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना चिंचाळा (ता. आष्टी)  घडली. यामुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असून शेतातील विद्युत खांबावर लोंबकळणाऱ्या तारा जीवघेण्या ठरू लागल्याने शेतकऱ्यांत महावितरणच्या भोंगळ कारभारा विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.  
तालुक्यातील चिंचाळा येथील लमाणतळ वस्ती येथील शेतकरी सुनील अंगद पोकळे यांच्या  ऊसाच्या शेतामध्ये सुनील पोकळे व मोहन पोकळे हे शेतकरी गुरुवारी ( दि. २०) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पाळी घालत असतांना विद्युत खांबावरील विद्युत पुरवठा करणारी थ्री फेजची तार तुटून खाली पडली. मात्र याची कल्पना शेतकरी सुनील व मोहन यांना नव्हती. त्यातच अचानक एका बैलाचा पाय तुटलेल्या विद्युत तारेवर पडल्याने त्याचा विद्युत शॉक लागून जागीच मृत्यू झाला. मात्र सुदैवाने लाकडाचे जु असल्यामुळे दुसरा बैल व या दोन शेतकरी यांचा जिव वाचला व पुढील अनर्थ टळला.  परंतु शेतकरी सुनील पोकळे यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान या घटनेची माहिती आष्टी पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. 

परिसरातील शेतात विद्युत खांबावरील वीजेच्या तारा ह्या ४० वर्षाच्या असून डोक्याला स्पर्श होईल एवढ्या अंतरावर लोंबकाळत असल्याने शेतकऱ्यांना आपल्या पशुधनासह जीव मुठीत घेऊन शेतीची कामे करावी लागत आहेत. आज त्यामुळेच शेतकरी सुनील पोकळे यांना आपला बैल गमवावा लागला. मात्र याकडं महावितरण साफ दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

No comments