Breaking News

तांबव्यात तरुणावर प्राणघातक हल्ला, कोयत्याने केली मारहाण, जखमी तरुणावर अंबाजोगाईच्या स्वारती रुग्णालयात उपचार


गौतम बचुटे । केज  
गायराणामधील मडके भाजण्याच्या आव्याची जागा का सोडत नाहीस ? असं म्हणत शिवीगाळ करून तरुणावर हल्लेखोराने कोयत्याने मारहाण केल्याची घटना घडली. या प्राणघातक हल्ल्यात तरुण गंभीररित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

 मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील तांबवा गावाच्या गायरान जमीनवर कुंभार समाजातील नितीन विलास परळकर हा तरुण आपल्या कुटुंबासह राहतोय. याठिकाणी नितीन  आपला रुढी परंपरागत मडके बनविण्याचा व्यवसाय करून आपल्या कुटूंबाचं पालन- पोषण करतोय. त्याच गायरान जमिनीवर धारूर तालुक्यातील कासारी बोडखा येथील अंकुश तिडके वास्तव्यास आहेत. सोमवारी (दि.१७)  सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास नितीन परळकरच्या घरा समोर अंकुश तिडके आला आणि नितीनला शिवीगाळ करु लागला. तेव्हा नितीनने शिव्या का देता असा सवाल करताच तुझी तुझी मडके भाजण्याची आव्याची जागा मला सोड; नाही तर मी तुला मारून टाकीन अशी धमकी देत अंकुश तिडके याने भांडण करण्यास सुरुवात केली. हा वाद एवढा विकोपाला गेला की, संतापलेल्या अंकुशने हातातील  कोयत्याने नितीनच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले. जखमी झालेल्या नितीनला उपचारासाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून त्याला पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वारती रुग्णालयात पाठविले.  दरम्यान सोमवारी (दि.१८) नितीन परळकर याच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अंकुश तिडके याच्या विरुद्ध गु.र.नं. ३१५/२०२० भा.दं.वि. ३२६, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ. धनपाल लोखंडे करत आहेत.

1 comment: