Breaking News

कडा आणि धानोऱ्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ; पोलिस गस्तची ग्रामस्थांची मागणी

के. के.  निकाळजे । आष्टी
तालुक्यातील कडा धानोरा या गावासह परीसरातील गावामध्ये चोऱ्यांचे प्रमाणात वाढ झाली असून रविवारी कडा येथे चार ठिकाणी तर मंगळवारी धानोरा येथे सहा ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. तर धानोरा येथे चोरी करताना चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांची गस्त या परिसरात वाढविण्याची मागणी होत आहे.

अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानोरा येथे मंगळवारी (ता.चार) मध्यरात्री अज्ञात सहा ते सात चोरट्यांनी महेश शेळके यांचे श्रीगणेश मेडिकलचे कुलुप तोडून रोख रक्कम दोन हजार रुपये तसेच अन्सार सय्यद व फारूक सय्यद या दोन्ही भावाच्या घरातून एकोणचाळीस हजार रुपये घेऊन पोबारा केला. सुलेमान देवळा मार्गावरील काळे मेडिकल व बबन होळकर यांचे घराचे कुलूप तोडले. तसेच चोरांनी धानोरा येथीलच अन्य तीन व्यक्तींचे घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात ते असफल ठरले. सदरील चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदरील घटनेचा तपास उपनिरीक्षक राहुल लोखंडे हे करत आहेत. तर कडा येथे रविवारी (ता.दोन) चार ठिकाणी तर जुलै महिन्यात पाच ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी रात्री गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

No comments