Breaking News

वेषांतर करून पकडला पिंपळगाव येथील सराईत गुन्हेगार


केज पोलीसांची सराईत गुन्हेगारविरुद्ध धडाकेबाज कार्यवाही 

पकडलेल्या गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्या अंतर्गत कार्यवाही : सराईत गुन्हेगाराची हर्सूल जेल मध्ये रवानगी

गौतम बचुटे । केज 
देशात गणेशोत्सवाची धामधूम आहे . त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून गुन्हेगारांची धरपकड सुरू असताना बीड जिल्ह्यात  दरोड्यासह इतर गंभीर गुन्हयात पोलिसांना हवा असलेला एक सराईत गुन्हेगारास केज पोलिसांनी वेषांतर करुन  रविवारी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी  बीड जिल्ह्यात उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी आपलं पोलिस बल कामी लावलं आहे. त्यातचं केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदिप त्रिभवन यांनी सराईत गुन्हेगार विक्रम शिवराम शिंदे (वय ३६ वर्ष रा. पिंपळगांव घोळवे ता. केज) याच्या विरुद्ध एमपीडीए कायद्या अंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांच्याकडे दाखल करण्यात आला होता. त्यानुसार सराईत गुन्हेगार विक्रम शिवराम शिंदेस स्थानबद्ध करण्यासाठी
 केज,  नेकनुर,  युसुफ वडगांव  येथील पोलीस प्रयत्न करत होते. तब्बल  दहा गुन्ह्याची नोंद असलेला व  पोलीस रेकॉर्डवर असलेला विक्रम शिवराम शिंदे  बीड पोलिसांना हवा होता.  विक्रम शिंदेवर यापूसीआरपीसी कलम ११० प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा ५५ प्रमाणे कारवाई करण्यात आली होती . परंतु त्याने प्रतिबंधक कारवाईस न जुमानता गुन्हे करण्याचे चालुच ठेवुन होते. प्रकरणात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी दि. १९ ऑगस्ट रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एमपीडीए कायद्या अंतर्गत आदेश पारीत करून त्यास तात्काळ ताब्यात घेवून हर्सुल कारागृह औरंगाबाद येथे हजर करून स्थानबध करणे बाबत त्यांचे कडील आदेश क्रमांक जा. क्र. २०२०/आरबी डेस्क- १/पोल-१ /एमपीडीए- ०७ दिनांक १९/०८/२०२० अन्वये आदेशित केले होते.
त्या नंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरिक्षक प्रदिप त्रिभवन यांना दिल्या होत्या. पोलीसांनी गोपनिय खबऱ्याचे मार्फत सदर इसम हा पिंपळगांव घोळवे ता. केज येथे असल्याची विश्वासनिय माहिती मिळाली. मात्र सदर गुन्हेगार हा सराईत असल्याने त्याला पोलिसांचा संशय येऊ नये म्हणून केज पोलीसांनी वेषांतर करुन शेतकऱ्यांच्या वेशात जाऊन अंत्यत चलाखीने व शिताफिने सापळा लावुन सदर इसमास ताब्यात घेतले. त्यास पोलीस ठाणे केज येथे हजर केले. त्या नंतर पोलीस बंदोबस्तात हर्सुल कारागृह, औरंगाबाद येथे स्थानबध्द करण्यासाठी रवाना केले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक भारत राऊत बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक प्रदीप त्रिभवन, पोलीस उपनिरिक्षक श्रीराम काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अभिमन्यु औताडे, केज पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम चेवले, बाळकृष्ण मुंडे, अशोक नामदास, धनपाल लोखडे यांनी केली.

भविष्यातही गुंडगिरी करणारे व कायद्याला न जुमानणाऱ्या व वाळु माफीया यांच्या विरुध्द एम.पी.डी.ए. कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिले आहेत

No comments