Breaking News

पिंपळगावमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या


बाबासाहेब देशमाने । दिंद्रुड 
 एका 48 वर्षीय शेतकऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील पिंपळगाव (नाखले) येथे घडली.

 माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळगाव (नाखले) येथील शंकर गणपतराव थावरे वय ४८ वर्षे रा. पिंपळगाव (नाखले) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. गुरुवारी सकाळी पिंपळगाव शिवारातील शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत प्रेत आढळून आले. दरम्यान फाशीवरील मृतदेह जमिनीवर अर्धवट लोंबकळत असल्याने, मृताचे दोन्ही पाय जमीनीवर टेकलेले असल्याने शंकर थावरे यांनी आत्महत्या केली का काही घातपात झाला आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. तशी उलट सुलट चर्चा गावकऱ्यात सुरू होती. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ दाखल होत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय माजलगाव येथे पाठवण्यात आला होता. सदरील मृतदेहावर दुपारी उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले. शंकर थावरे यांनी आत्महत्या केल्याचे सिद्ध झाले असल्याचे ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे यांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंद्रुड पोलीस अधिक तपास करत आहेत.

No comments