Breaking News

अव्वाच्या सव्वा वीज बिलानं जनता हैराण, महावितरणचे अधिकारी मात्र धुंदीत!

दुरुस्ती करुन बीडकरांना माफक वीज बील द्या 'वंचित'ची मागणी 
बीड : लॉकडाऊन मधील काळातील नागरिकांचे वीज बील माफ करण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं. मात्र महावितरणने बीड जिल्ह्यात अव्वाच्या सव्वा वीज बील ग्राहकांच्या माथी मारली आहेत. या संदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आल्यानंतर उडवा-उडवीची उत्तरे दिली जात असून महावितरणच्या या अंधाधुंद कारभाराने जनता हैराण झाली आहे. वीज बिलात दुरुस्ती करुन बीडकरांना माफक वीज बील देण्यात यावे. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकाद्वारे करण्यात आली आहे. 

कोरोना वैश्विक महामारीमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी रोजगारासह आर्थिक व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे सर्व सामान्यांचे जगणे मुश्किल झाले असताना बीड जिल्हात महावितरणने ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बील देवून बीडकरांना शॉक दिला. या संदर्भात चौकशी करण्यासाठी नागरिक गत महिनाभरापासून महावितरणचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र महावितरणचे अधिकारी-कर्मचारी नागरिकांना उडवा-उडवीचे उत्तरे देत असल्याने बीडकर हतबल झाले आहेत. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांची आर्थिक पिळवणूक करण्याचा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विडा उचलला असल्याचे यातून दिसत आहे. त्यामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे वीज बिलात दुरुस्ती करून नागरिकांना माफक वीज बिल देण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.   

अन्यथा इंगा दाखवू ; वंचितचे नेते  डॉ. सोनवणे यांचा  इशारा 

जिल्ह्यात महावितरण मध्ये नव्याने रुजू झालेले अधिकारी नागरिकांशी बेजाबदार पणे वागत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यातच अधिकारी फोन उचलत नाहीत कर्मचारी वेळेवर येत नाहीत कस्टमर केअरला आज फोन केला तर कार्यवाहीसाठी दोन दिवसांनी फोन येतो. हे वास्तव असून हा केवळ खासगीकरणाचा परिणाम आहे. सरकारने घोषणा केली होती, की लॉकडाऊनच्या काळामधील सर्व सामान्यांचे वीज बिल माफ करण्यात येईल. मात्र महावितरणने नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीज बील देऊन सरकारची ही घोषणा फसवी असल्याचे बीड जिल्ह्यात सिद्ध केले आहे. नागरिकांच्या वीज बील मध्ये त दुरुस्ती करून माफक बील देण्यात यावे. तसेच मग्रूर अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महावितरणला  इंगा दाखवण्यात येईल, असा इशारा वंचितचे नेते डॉ. सोनवणे यांनी दिला आहे.

No comments