Breaking News

पंकजा मुंडे, शेलार, तावडे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत?; दिल्लीत हालचालींना वेगमुंबई: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, आशिष शेलार आणि विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत तळ ठोकून असल्याने या चर्चेला अधिक बळ मिळालं आहे. जे. पी. नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतरच्या या नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चार नेत्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीत सुरू असलेल्या भाजपच्या गोटातील हालचालीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
जे. पी. नड्डा यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची २० जानेवारी रोजी सूत्रे स्वीकारली होती. नव्या अध्यक्षाबरोबरच नवी कार्यकारिणी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, करोना आणि लॉकडाऊन यामुळे ही कार्यकारिणी लांबली होती. मात्र, येत्या ८ ते १० दिवसात ही नवी कार्याकारिणी अस्तित्वात येण्यार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे आणि संभाजी निलंगेकर-पाटील या महाराष्ट्रातील चार नेत्यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच माजी मंत्री हंसराज अहिर यांनाही राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचीही भाजपच्या संसदीय कार्य समितीत नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फडणवीस सध्या दिल्लीत आहेत. दरम्यान, पंकजा मुंडे यांना भाजपच्या राज्य कार्यकारिणीत स्थान देण्यात आले नव्हते. त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे मुंडे यांची राष्ट्रीय कार्यकारिणीवर वर्णी लागण्याच्या शक्यतेला अधिक बळ मिळालं आहे. मात्र पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय स्तरावर कोणती जबाबदारी देण्यात येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तर, विनोद तावडे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात आली नव्हती. तसेच राज्याच्या कार्यकारिणीतही त्यांना महत्त्वाचं स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, राष्ट्रीय स्तरावर त्यांच्याकडे कोणती जबाबदारी मिळणार? याबाबत अद्याप स्पष्टतता झालेली नाही. तर आशिष शेलार यांना मात्र राष्ट्रीय कार्यकारिणीत अत्यंत महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता  आहे.

खडसेंचा विचार नाही
दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. खडसे यांनी आधीच राष्ट्रीय राजकारणात रस नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर कोणतीही जबाबदारी दिली जाणार नसल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

No comments