Breaking News

घाबरून न जाता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा - धनंजय मुंडें

परळीत आढळलेल्या कोरोना बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग युद्धपातळीवर सुरू, नागरिकांनी सहकार्य करण्याचं मुंडेंनी केलं आवाहन

परळी : परळी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया मधील 5 कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याची बातमी कळताच त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग युद्ध पातळीवर सुरू असून शहरात पुढील 8 दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बँकेत व संबंधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःहुन प्रशासनाला माहिती द्यावी, आवश्यकतेनुसार आरोग्य तपासणी करून घ्यावी तसेच कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ स्वॅब तपासणी साठी पुढे यावे असे आवाहन परळीचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

बँकेत वावर असणाऱ्या शहर व ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या मोठी असल्यामुळे कोरोनाची साखळी निर्माण होऊ नये यामुळे शहरात पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरात प्रभागनिहाय आरोग्य समिती नेमून त्यामार्फत नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्याचे निर्देश ना. मुंडे यांनी दिले असून, सदर बँकेकडे दत्तक असलेल्या जवळपास 15 गावांमध्ये आरोग्य सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार कंटेंटमेंट झोन लागू करण्याच्या सूचना ना. मुंडेंनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

दरम्यान आरोग्य व पोलीस यंत्रणा परिस्थिती हाताळण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत असून नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे, संपर्कात आलेल्यांनी स्वतःहून समोर येऊन आपली माहिती द्यावी, जेणेकरून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मदत होईल असे आवाहन ना. मुंडे यांनी केले आहे.

शनिवारी सायंकाळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील स्टेट बँकेच्या 5 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शहरात व बँकेशी सातत्याने संपर्क असणाऱ्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, त्यानंतर आता जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी नागरिकांना धीर देत काळजी घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. परळी परिसरातील नागरिकांनी पुढील काही दिवस शहरात येणे टाळावे, सदर बाधित कर्मचाऱ्यांचे मागील काही दिवसातील संपर्क तपासून त्यांची यादी बनवून त्यानुसार आरोग्य तपासणी करणे, तसेच परळी शहरात प्रभागनिहाय आरोग्य समित्या बनवून त्याद्वारे शहरातील नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करणे याची प्रक्रिया ना. मुंडे यांच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता पोलीस व आरोग्य प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे असेही ना. मुंडे यांनी म्हटले आहे.

No comments