Breaking News

एसटी महामंडळातील दीड हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा खंडित


प्रतिकात्मक

कर्मचारी- कामगार संघटना मध्ये संताप

मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सध्या एसटी महामंडळाची सेवा कमी प्रमाणात सुरु आहे. याचा फटका एसटीच्या कमाईला बसला आहे. त्यामुळे सध्या कंत्राटी पदावर काम करणाऱ्या 1500 कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्यात आली आहे. लवकरच टाळेबंदी संपल्यानंतर या कर्मचाऱ्यांना आम्ही पुन्हा सेवेत घेऊ. कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं नाही तर त्यांची काही दिवसांसाठी सेवा खंडित करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. सेवा खंडित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये चालक-वाहकांसोबतच सहाय्यक लिपिक, टंकलेखक यांचा समावेश आहे. कामगार संघटनांनी मात्र ही संख्या चार हजारांच्या आसपास असल्याचं म्हटलं आहे.
याबाबत आणखी माहिती देताना शेखर चन्ने म्हणाले की, "एसटी महामंडळाने कोणत्याही कर्मचाऱ्याला काढलेलं नाही. सध्या 1500 कर्मचाऱ्यांची सेवा काही कालावधीसाठी खंडित करण्यात आलेली आहे. हे सर्व कर्मचारी एसटी महामंडळात वेगवेगळ्या विभागात रोजंदारीवर काम करतात. सध्या एसटी महामंडळाची जिल्हातंर्गत सेवा सुरु आहे. त्यामुळे जादा मनुष्यबळाची गरज भासत नाही. एकदा एसटी महामंडळाची सेवा पूर्ववत सुरु झाली की, आम्ही पुन्हा पूर्ववत त्यांना कामावर घेऊ. शेवटी एसटी महामंडळाला देखील कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे."
कोरोना व्हायरसमुळे एसटी महामंडळाची आर्थिक बाजू पूर्णपणे ढसाळली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या एसटी महामंडळाच्या निर्णयाचा कामगार संघटनांकडून निषेध करण्यात येत असून संताप व्यक्त केला जात आहे.

1 comment: