Breaking News

राजग्रह' वरील हल्याचा सावता परिषदेने केला निषेध

हल्लेखोरांना ताबडतोब जेरबंद करण्याची परिषदेचे अध्यक्ष आखाडे यांनी केली मागणी
बीड : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राहिलेल्या 'राजग्रह' वरील धुडगूस व तोडफोड ही अत्यंत गंभीर व निंदनीय आहे. या घटनेचा सावता परिषदेच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध करण्यात येत असून यातील माथेफिरू प्रवृत्तीच्या समाजकंटक हल्लेखोरांना ताबडतोब जेरबंद करून या प्रकरणाचा छडा लावावा अशी मागणी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

             पत्रकात पुढे म्हटले आहे की, राजग्रह ही फार मोठा ऐतिहासिक संदर्भ असलेली वास्तू आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्यासोबतच त्यांच्या अनेक कार्याची व चळवळीची साक्षीदार असणारी ही इमारत आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर पुस्तके ठेवता येतील याचे नियोजन करूनच त्या वेळी त्यांनी बांधकाम रचना केलेली असल्याने राजनिती, कायदेविषयक, अर्थशास्त्र, युद्धनिती, धर्मशास्त्र, तत्वज्ञान आदी संदर्भातील हजारो पुस्तकांची ग्रंथसंपदा आज मित्तीला राजगृहामध्ये आहे.
          त्यामुळे राजग्रह ही केवळ वास्तू व इमारत नसून पुरोगामी चळवळीसाठी दिपस्तंभ आहे. फुले-शाहू-आंबेडकरी विचारसरणीच्या जनतेसाठी प्रेरणाकेंद्र आहे. अशा ठिकाणी घुसून धुडगुस घालत तोडफोड व नासधूस करणे ही गंभीर व संतापजनक आहे. अशाप्रकारचे विध्वंसक कृत्ये करणाऱ्या या आरोपीना तातडीने ताब्यात घेऊन यातील धागे-दोरे तपासून त्यांचा 'करविता धनी' कोण याचा तपास काढावा व कठोरात कठोर कारवाई करावी असेही आखाडे यांनी म्हटले आहे.

No comments