Breaking News

क्षीरसागरांनी नुसते राजकारणच केले; तेलगाव नाका परिसरात घरांमध्ये पाणी घुसले

पीडित लोकांना घेऊन शिवसंग्राम पदाधिकारी नगर परिषदेवर धडकले 

स्थानिक आमदारांनी शोबाजी बंद करावी अन दिलेले आश्वासन पूर्ण करावे - लालाभाई शेख

बीड  : गेल्या १० वर्षांपासून तेलगाव नाका परिसर, हुसेनीया कॉलनी या भागात मोठ्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून लोकांच्या घरात शिरते आहे. अस्वच्छ पाण्यामुळे येथे राहण्यासारखे वातावरण देखील राहत नसून या भागाला लागलेला अभिशाप काही केल्या आपल्या नगरपरिषदेकडून दूर केला जात नाही. याबाबत निवडणुकीच्या आधी मतांसाठी विद्यमान स्थानिक आमदारांनी ठिय्या मांडला, प्रश्न सोडवण्याची जबाबदारी घेतली मात्र उपाययोजनेचा नावाखाली काहीच केले नाही. नुसती शो बाजी करून प्रश्न सुटत नसतात. आज त्या भागातील लोकांच्या घरात पाणी घुसत आहे, दिलेला शब्द पूर्ण होत नाही तर नुसत्या मतांसाठी आश्वासन दिले होते का? हे देखील स्थानिक आमदारांनी सांगायला हवे असे शिवसंग्राम विभागप्रमुख लालाभाई शेख यांनी म्हंटले आहे.   

    यापूर्वी नगर परिषद प्रशासन, नगराध्यक्ष, स्थानिक आमदारांना वारंवार सांगूनदेखील कसलीही उपाययोजना झालेली नाही. अजून किती दिवस या भागातील लोकांनी नरकयातना भोगायच्या? आम्ही याच शहरातील रहिवाशी आहोत मात्र आमच्याशी अशी वागणूक का होत आहे? नगरपरिषद जाणीवपूर्वक हा प्रश्न का सोडत नाही? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. नगराध्यक्षांना बीड शहरातील एकच भाग माहित आहे. बिंदूसुरेच्या पलीकडे देखील लोक आहेत अन ते माणसच आहेत याचा विसर पडला असले तर मते मागताना बार्शी नाका, मोमीनपुरा, तेलंगाव नाका, इस्लामपुऱ्यात पुढच्या वेळेस लोक पाय ठेऊन देणार नाहीत हेही लक्षात असू द्या असे शेख यांनी म्हंटले आहे. 

  आधीच कोरोनाने हाहाकार माजवला आहे. परिवाराची स्वच्छता कधी केली जात नाही, नालीचे पाणी घरात घुसत असताना नगर परिषद दखल घेत नसेल तर आम्ही कुणाकडे जायचे ? माननीय महोदय आपण लक्ष घालून न्याय द्यावा, आमच्यावर होत असलेला अन्याय दूर करून आमचा प्रश्न सोडवण्यात यावा अशी मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे शिवसंग्रामचे विभागप्रमुख लालाभाई शेख यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, मुस्ताफा शेख, इम्रान शहा, शेख युनूस, अमर शैख, शेख मेनू, पठाण अन्वर, शेख तुराब, शेख शब्बीर आदींची उपस्थिती होती. 

No comments