Breaking News

काळूचीवाडी रस्त्याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचे दुर्लक्ष

शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून केला घाटातील रस्ता दुरुस्ती : उर्वरित काम झाले नाही तर आंदोलनाचा ईशारा
गौतम बचुटे । केज
केज तालुक्यातील  तरनळी व काळूचीवाडी ही ग्रुप ग्रामपंचायत असलेली काळूचीवाडी ही डोंगर पट्ट्यात येत असल्याने येथील नागरिकांना येण्या- जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था असताना देखील या भागातील विद्यमान जि.प.सदस्य व आमदार यांच्यासह प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने काळूचीवाडी येथील शेतकरी आणि नागरीकांनी आर्थिक अडचणीतही एकत्र येऊन लोकवर्गणी जमा केली. त्या जमा झालेल्या लोकवर्गणीतून जे.सी.बी.च्या साह्याने घाटातील रस्त्याची दुरुस्ती केली आहे. उर्वरीत राहीलेल्या रस्त्याची दुरुस्ती ही प्रशासनाने तात्काळ करावी. रस्ता दुरुस्ती न केल्यास काळूचीवाडी येथील नागरीक लोकशाही मार्गाने अंदोलन करणार असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.

केज तालुक्यातील तरनळी व काळूचीवाडी या दोन गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे. तरनळी पासून अंदाजे पाच कि.मी. अंतरावर असलेल्या काळूचीवाडीची लोकसंख्या ४०० आहे. येथील नागरिकांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी रस्ता हा डोंगराच्या घाटातून जाणारा रस्ता आहे. काळूचीवाडी येथील नागरीकांना प्रशासन व लोकप्रतिनिधी हे फक्त निवडणूक काळातच भेट देतात. एकदा का निवडणूक झाली की, या वस्तीतील नागरिकांना भेटायला कोणी ही येत नाही. त्यामुळे या रस्त्याकडे शेतकरी सोडता कोणाचेही लक्ष जात नसल्याने हा रस्ता आजपर्यंत नादुरुस्त राहीला आहे. एखाद्या वेळी दिवसा देखील एखाद्या वयोवृद्ध माणूस अथवा महीला आजारी पडली तर किंवा महीलेला डिलिव्हरीसाठी दवाखान्यात पाठवायचे असेल तर येथील नागरिकांना प्रश्न पडतो की, या आजारी व्यक्ती व महीलांना दवाखान्यात कसे घेऊन जायचे? अनेक वेळा नागरिकांनी या आपल्या आजारी नातेवाईकांना वाडीतून आपल्या पाठीवर घेऊन डोंगरपार करून घुले वस्तीवर आणुन तेथून पुढे वाहनाद्वारे दवाखान्यात नेऊन औषधोपचार केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. काळूचीवाडी येथील नागरिकांना येण्या जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून काळूचीवाडी येथील रहिवासी
मारोती बिक्कड, गोकुळ सरवदे, विनायक सारुक, शिवाजी सारुक, दादासाहेब सरवदे, अंकुश सरवदे, दिलीप सरवदे या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपसांत लोकवर्गणी जमा करून एका जे.सी.बी.च्या साह्याने काळूचीवाडीकडे जाणाऱ्या घाटातील रस्ता दुरुस्ती केला. उर्वरित राहीलेला रस्ता हा तात्काळ दुरुस्त करुन या भागातील नागरिकांची होणारी गैरसोय व हेळसांड थांबवावी अन्यथा काळूचीवाडी येथील नागरिक येत्या काही दिवसात लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहेत.

No comments