Breaking News

शिवसंग्रामकडून शिवद्रोही अग्रीमा जोशुआविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी विविध पोलीस ठाण्यात तक्रारी


  

अग्रीमावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा; शीतलताई पिंगळे, हातागळे, तांबे यांची मागणी  बीड : शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायकराव मेटे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या स्टँडअप कॉमेडीयन अग्रीमा जोशुआविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्य शासनाकडे काल केली आहे. आज दुपारपर्यंत संबंधित कॉमेडीयनविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नसल्याचे पाहून शिवसंग्राम महिला आघाडीने जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे यांच्या मार्गदर्शनखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यामध्ये त्यांनी अग्रीमा जोशुआ यांच्या वक्तव्यामुळे जगभरातील शिवप्रेमी व आपल्या भावना दुखावल्या असून त्याबाबत गुन्हा दाखल करावा अशी मागणी तक्रारीद्वारे शिवसंग्राम महिला आघाडी, तालुकाध्यक्षा शीतलताई पिंगळे यांनी केली आहे. सोबतच युवक जिल्हा सरचिटणीस  विनोद हातागळे यांनी पेठ बीड पोलीस ठाण्यात व विद्यार्थी आघाडीकडून शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आलेली आहे. 

    अग्रीमा जोशुआने मुंबईतील अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबाबत अन छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेलं व्यक्तव्य हे याच महाराष्ट्रात राहून करणे अत्यंत संतापजनक आहे. या लोकांची अशी हिम्मत होतेच कशी? जगभरातील शिवप्रेमींकडून या गैरकृत्याचा निषेध अन संताप व्यक्त केला जात आहे. संपूर्ण देशासाठी ते आदर्श असताना या कॉमेडीयनला थट्टा करावा वाटत असेल तर गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करायला हवीच. शिवसंग्रामकडून याबाबत तक्रारी दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे. अशा कृत्यांना तात्काळ आळा घालायला हवा, वादग्रस्त वक्तव्य करायचे, भंपक प्रसिद्धी मिळवायची अन नंतर आरोप झाल्यानंतर माफी मागायची असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, संबंधित जोशुआनामक महिलेवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी शीतलताई पिंगळे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली आहे. यावेळी गेवराई तालुकाध्यक्षा साधनाताई दातखीळ, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, पेठ बीड पोलीस ठाण्यात युवक आघाडीचे जिल्हा सरचिटणीस विनोद हातागळे तसेच विद्यार्थी आघाडीचे सौरभ तांबे, अनिकेत देशपांडे, सुनील धायजे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. 

No comments