Breaking News

पिता कोठडीत तर माय-लेकी बालसुधार गृहात


सैराट झालेल्या जोडप्याने केलं लग्न मात्र केज पोलिसांनी तब्बल दीड वर्षांनं पकडलं
केज पोलिसात आरोपीवर बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचे कलमात वाढ 
गौतम बचुटे । केज 
अल्पवयीन मुलीस तिच्या चुलत मामीच्या भावाने पळून नेल्याची घटना घडल्यानंतर केज पोलिसांनी तब्बल दीड वर्षानंतर आरोपीचा शोध घेऊन त्याला बुधवारी (दि.१६) मध्यरात्री एक वाजता अटक केली. मात्र त्याच्या पासून त्या मुलीस एक मुलगी झाली असून माता व मुलीस बालसुधार गृहात ठेवण्यात आल्याचे समजते. 

केज तालुक्यातील बोरगावात हिंगोली जिल्हतून मामाच्या घरी शिक्षणासाठी भाची आली होती. इयत्ता अकरावीत शिक्षण घेत असताना तिचे आणि चुलत मामीच्या भावासोबत सूत जुळले. दरम्यान मामाच्याच मुलाबरोबर तिचा विवाह लावण्यात येणार असल्याची त्या दोघांना झाल्या नंतर त्यांनी पळून जावून विवाह करण्याचा बेत आखला. त्या नुसार  दोघांनी दि. 7 जानेवारी 2019 ला पलायन केले. 

दरम्यान त्यावेळी याप्रकरणी मुलीच्या मामाच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीस पळवून नेल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. आरोपी व त्या मुलीचा केज पोलीस शोध घेत असताना दोन दिवसा नंतर त्या दोघांनी दि. ९ जानेवारी २०१९ रोजी सातेफळ (ता. केज) येथील देवीच्या मंदिरात लग्न करून ते, दोघे सांगली जिल्ह्यातील मिरज येथे पती-पत्नी म्हणून राहू लागले. या दरम्यान त्या अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली व दि.१ जानेवारी २०२० रोजी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. 

मात्र या गुन्ह्याचा तपास केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे करीत होते. पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांना आरोपीची माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून आरोपी बेसावध असतानाच त्यांचे सहकारी पोना गुंजाळ व  मंदे यांनी बुधवारी (दि.१६) जुलै रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातील आढाळा ता. कळंब येथून हनुमंत वाटोडे यास ताब्यात घेऊन अटक केली. तसेच गुन्हा दाखल झालेल्या घटनेच्या वेळी सदर मुलगी ही अल्पवयीन असल्याने आरोपी विरोधात भा. दं. वि. ३६३ आणि ३७६ व अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा २०१२ चे कलम ४,६, ८ व १० नुसार गुन्ह्यात वाढीव कलमांचा समावेश करण्यात आली आहे. त्या मातेला आणि तिच्या सहा महिन्यांच्या चिमुकलीला बालसुधार समिती समोर हजर करून तिला तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे  समजते.

याप्रकरणी आरोपी हनुमान वाटोडे याला  अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांनी आरोपी हनुमान वाटोडे याला दि. २१ जुलै २०२० पर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

तपासी अधिकारी
 पो. उपनिरीक्षक 
दादासाहेब सिद्धे                                            पो नि प्रदीप त्रिभुवन

No comments