Breaking News

कोरोनाचा समुह संसर्ग टाळण्यासाठी 1 लाख 10 हजार लोकसंख्येचे आरोग्य महासर्वेक्षण

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने बीड शहरातील पेठ बीड आणि मोमीनपुरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत नियोजन

बीड : शहरात समुह संसर्गाचा धोका वाढल्यामुळे आरोग्य विभागाने घरोघर सर्वेक्षणाचा निर्णय घेतला असून उरलेल्या लाखभर लोकांचे सर्वेक्षणदेखील दोन दिवसात सुुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरी तपासणीसाठी आलेल्या आरोग्य पथकाला सहकार्य करावे आणि आपल्या आसपास कोणी बाहेरगावाहून आले असल्यास त्याची माहिती आरोग्य कर्मचार्‍यांना द्यावी तसेच घरातच रहावे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी दिली.

शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने बीडच्या शहरी भागात आरोग्य सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. या सर्वेक्षणासाठी आरोग्य अधिकारी कर्मचार्‍यांसह अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, बहुउद्देशीय कर्मचार्‍यांची   पथके तयार करण्यात आली असून बीडमधील पेठ बीड आणि मोमीनपुरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत विविध भागात घरोघरी जावून नागरिकांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
या उपकेंद्राअंतर्गतच्या विविध नागरी वसाहतीतील तब्बल 22 हजार 105 घरांमधील 1 लाख 10 हजार 601 लोकांची आरोग्या संदर्भात माहिती जाणुन घेतली जाणार आहे.यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या निर्देशानुसार  त्याची नोंद इजी अ‍ॅपमध्ये घेतली जात आहे.
सर्वेक्षण होणाऱ्या संबंधित घरातील व्यक्तींच्या मोबाइलमध्ये आरोग्य सेतू  ॲप  डाउनलोड करण्यात येईल.  तसेच  घरातील व्यक्तींमध्ये बीपी, शुगर, क्षयरोग, कॅन्सर असे आजार असतील तर  यांची माहिती  तात्काळ  शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात येईल. तसेच मागील आठ दिवसात सारी, ईएलआयची ( sari/ ili) लक्षणे आढळुन आल्यास त्याचबरोबरच ज्या व्यक्तींना सदी,खोकला असतील तर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्लाने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येतील. या सह बीड शहरात  कोरोना प्रादुर्भाव असलेल्या औरंगाबाद, पुणे, मुंबई, सोलापूर, नाशिक, नागपूर इत्यादी भागातून आलेले व ज्यांचा बीडमधील वास्तव्य कालावधी 5 ते 14 दिवसांचा आहे अशा नागरिकांशी नोंद घेतली जात आहे. या बरोबरच अन्य माहितीही नोंदवली जात आहे.
बीड शहरातील एमआयडीसी, पुरग्रस्त कॉलनी, पेठ बीड, सराफा लाईन, माळीवेस, धोंंडीपुरा, शाहुनगर, बालेपीर, जुना नगर नाका, पांगरी रोड, शिवाजीनगर, संत नामदेवनगर, पंशील नगर, गांधी नगर, मोहम्मदीया कॉलनी, मोमीनपुरा, बार्शी नाका, चंपावती नगर, धांडे गल्ली, खडकपुरा या नागरी आरोग्य उपकेंद्रांतर्गतच्या विविध भागात हे आरोग्य सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. सर्वेक्षणासाठी टीम सदस्य म्हणून एएनएम, आशा, शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा समावेश आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पवार यांनी दिली.

No comments