Breaking News

सेवा निवृत्त जवानाची क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक

खात्यावरील तब्बल ८४ हजार रुपयांवर मारला डल्ला

" सदर प्रकरणी आमचा काही सबंध नसून चौकशी अंती सर्व स्पष्ट होईल." असे क्रेडिट कार्ड एजंट सूरज पुरी म्हणाले.

गौतम बचुटे। केज 
क्रेडिट कार्ड वरील शिल्लक रकमेवर दुसऱ्यानेच हात साफ केल्याचा प्रकार केजमध्ये नुकताच समोर आलाय. तालुक्यातील शेलगाव येथील सेवा निवृत्त जवानाच्या क्रेडिट कार्डच्या खात्यावरील तब्बल ८४ हजार रुपयांवर ऑनलाईन खरेदी करून अज्ञात व्यक्तीने परस्पर डल्ला मारला आहे. दरम्यान फसवणूक झाल्याप्रकरणी सेवा निवृत्त जवानाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील शेलगाव गांजी येथील केंद्रीय राखीव सुरक्षा दलातील सेवा निवृत्त जवान महारुद्र पटणे यांचे स्टेट बँक ऑफ केज शाखेत बचत खाते आहे. त्यांनी सूरज पुरी या एजंटाकडून क्रेडिटकार्ड काढून घेतले होते. मात्र सदर क्रेडिटकार्ड काढल्या नंतर त्यांनी, ते कार्ड सुरू करण्यासाठी त्याचा पिन नंबर जनरेट केलेला नव्हता आणि त्याचा वापर सुद्धा केला नाही. मात्र २१ मे रोजी त्यांच्या खात्यातून अचानक ८४ हजार रुपये क्रेडिट कार्डद्वारे फ्लिपकार्टवर खरेदी केल्यामुळे रक्कम कमी झाल्याचा त्यांना मोबाईलवर मेसेज आला. त्यानंतर ते घाबरून गेले. मात्र २२ मे रोजी सुट्टी असल्यामुळे दि. २३ मे रोजी याची चौकशी करण्यासाठी ते बँकेच्या शाखेत गेले. मात्र त्यांना सुरक्षा रक्षकाने हाकलून लावले. तसेच त्यांनी दि.२३ मे रोजी खात्यातील स्टेटमेंट काढण्यासाठी बँकेत अर्ज देऊनही बँकेने त्यांना तब्बल चार दिवसानंतर म्हणजे २७ मे रोजी स्टेटमेंट उपलब्ध करून दिले. त्याद्वारे पटणे यांना माहीत झाले की, त्यांच्या क्रेडिट कार्ड आधारे बेंगलोर येथे दोन दिवसांत ६ मार्च रोजी एकदा ४९९०० हजार रु, दुसऱ्यांदा ७ मार्च रोजी १५००० रु.व तिसऱ्या वेळी १५००० रु. अशा प्रकारे एकूण फ्लिपकार्टद्वारे खरेदी केली आहे. २१ मे रोजी महारुद्र पटणे यांना त्यांच्या खात्यातून ८४,००० रु ट्रांझेक्शन झाल्याचे समजले. तसेच त्यांच्या क्रेडिट कार्डची प्रति दिवस मर्यादा ही फक्त १६००० रु. एवढी असताना एवढी मोठी रक्कम जर ऑनलाईन खरेदीद्वारे कमी होत असताना बँकेने याबाबत ग्राहकांशी संपर्क साधने किंवा त्यांचे खाते बंद करणे आवश्यक असताना; त्यांनी कार्यवाही केली नाही. तसेच ग्राहक चौकशी करण्यासाठी शाखेत गेले असता त्यांना प्रतिसाद दिला जात नाही. उलट ग्राहकाला सुरक्षा कर्मचाऱ्याद्वारे हाकलून लावले जाते. त्यामुळे महारुद्र पटणे यांनी २३ मे रोजी बीड येथील सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार केली असून केज पोलीस ठाण्यात तक्रार देऊन याप्रकरणात बँक व्यवस्थापक व क्रेडिट कार्ड काढून देणारे एजंट हे दोषी असून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी महारुद्र पटणे यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल रुक्मिणी पाचपिंडे या पुढील तपास करीत आहेत.

No comments